इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वणी यांच्या वतीने आयोजित भव्य आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल संघाने अंतिम सामन्यात बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत शहर व परिसरातील ८ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा अंतिम सामना लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध मॅक्रून स्टुडंट्स अकॅडमी यांच्यात अतिशय रोमांचक ठरला. या सामन्यात लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मॅक्रून स्टुडंट्स अकॅडमीचा तब्बल 41 धावांनी पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ राहुल खाडे यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी मंचावर प्राचार्य प्रशांत गोडे धवल पटेल, मधुकर कोंगरे , प्रशांत झाडे, , विनोद केशवानी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला 11000 ₹ रोख व चषक उपविजेत्या संघाला 7000/- ₹ रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्यात आले.
लायन्स स्कूलचे व्रीद ओंधरे याने अष्टपैलू कामगिरी करत 'मॅन ऑफ द सिरीज' आणि 'बेस्ट बॉलर' हे दोन्ही पुरस्कार पटकावले, तर मोहित धनेगावकर याने उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर 'बेस्ट बॅट्समन'चा बहुमान मिळवला.अंतीम सामन्यात मॅन ऑफ दी मॅच मानकरी अंशुल भुजाडे ठरला. इतर वैयक्तिक पारितोषिके हर्ष खोब्रागडे, प्रीत खिरटकर, संकेत झाडे, फैजल शेख यांनी पटकाविली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी मनोगत व्यक्त करुन उभय संघांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुधीर लडके यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मदन, सचिन पांडे, श्याम कडू, आकाश वारारकार, अनुज साठे, यांच्यासह एलेव्हन स्टार क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.
क्रिडा प्रशिक्षक अविनाश ऊईके व विजेत्या खेळाडूंचे लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपाध्यक्ष बलदेव खुंगर व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक चित्रा देशपांडे व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले. आयोजकांचे वणी परिसरातील क्रीडाप्रेमींकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

