वणी :
भगवंताची असीम कृपा म्हणून लाभलेला नरदेह हा अत्यंत दुर्मिळ असून, या देहाचे सार्थक भक्ती, उपासना आणि साधनेतूनच होऊ शकते. केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टींत जीवन व्यतीत न करता आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून नरतनूची पर्वणी साधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी केले.
स्थानिक जैताई देवस्थानात आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कीर्तनसेवा सादर करताना त्या बोलत होत्या. संत कवी श्री दासगणू महाराज यांच्या ‘नरतनु तुला लाभली पर्वणी भली...!’ या सुंदर पदाचे निरूपण करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती आणि साधनेचे महत्त्व पटवून दिले.
नारदीय कीर्तन, वारकरी संप्रदाय आणि रामदासी परंपरा यांचा सुंदर संगम असलेल्या दासगणू महाराजांच्या कीर्तनपरंपरेचे दर्शन यावेळी घडले. श्री दासगणू महाराजांचे विविध अभंग सादर करत डॉ. देशपांडे यांनी संतवचनांच्या माध्यमातून जीवनातील आध्यात्मिक मूल्ये उलगडून दाखविली.
पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाचे महत्त्व, संतांना काय आवडते यापेक्षा त्यांना काय आवडत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता, तसेच तीर्थयात्रांचे महत्त्व अशा विविध विषयांवर त्यांनी प्रभावी विवेचन केले. संतविचारांच्या आधारे दैनंदिन जीवनात आचरणात आणावयाच्या मूल्यांचीही त्यांनी जाणीव करून दिली.
यावेळी जैताईसेविका सौ. अलका चंद्रकांत अणे यांच्या हस्ते देवस्थानच्या वतीने कीर्तनकार डॉ. प्रज्ञा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. मध्यंतरात डॉ. ऐश्वर्या अनिकेत अलोणे यांनी जगदंबेचा श्रवणीय गोंधळ सादर करून कार्यक्रमात भक्तिरसाची भर घातली.
उत्तररंगात डॉ. देशपांडे यांनी मीराबाई यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन केले. विशेषतः मीराबाईंच्या कृष्णभक्तीत रंगलेल्या रामभक्तांच्या समूहाचा प्रसंग त्यांनी प्रभावीपणे सादर केला. त्यांच्या निरूपणाने आणि भक्तिपूर्ण सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या कीर्तनसेवेला प्रशांत ठाकूर यांनी संवादिनीवर, अमोल बावणे यांनी तबल्यावर, तर सौ. प्रणिता पुंड यांनी मंजिरीवर साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताईसेवक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. जैताई देवस्थानातील या कीर्तनसेवेमुळे शारदीय नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आध्यात्मिक चिंतनाची भर पडली.

