भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने नगर वाचनालय, वणी आणि लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल (रवीनगर)यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नगर वाचनालयाला शैक्षणिक भेट देऊन ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.
वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे सचिव गजाननराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे उपस्थित होत्या.
यावेळी प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाची शैक्षणिक भेट घडवून आणल्याबद्दल वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
नगर वाचनालयाला प्राप्त असलेल्या ‘अ’ दर्जाचा उल्लेख करत गजाननराव कासावार यांनी वाचनालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. ग्रंथालयातील विविध विभागांचे कामकाज, ग्रंथांचे व्यवस्थापन आणि वाचकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देतानाच विविध वयोगटांतील वाचकांच्या आवडी-निवडी, वाचनाच्या सवयी आणि वाचनालयाकडे असलेला त्यांचा कल याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे देत आपल्या जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडविले. या संवादातून वाचनालयाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. पुस्तकांचे जग समृद्ध असून, वाचनामुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, याची जाणीव या उपक्रमातून विद्यार्थ्यांना झाली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी वाचनालयातील ग्रंथांची मांडणी, पुस्तकांचे वर्गीकरण, जतन आणि देवाणघेवाणीची प्रक्रिया समजून घेतली. बालवाचन कक्ष, स्त्री वाचन कक्ष, विविध ग्रंथदालने आणि सभागृहाची पाहणी करताना त्यांना वाचनालयाच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच वाचनालयात येणारी वृत्तपत्रे, पुस्तकांची उपलब्धता, सभासदत्वाची प्रक्रिया, वार्षिक शुल्क आणि मासिक वर्गणी याविषयीही विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
साहित्यिक, वैचारिक, धार्मिक, ललित साहित्य, कादंबरी, कथा, नाटक तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या अद्ययावत पुस्तकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील विविध पुस्तकांची पाहणी करत विद्यार्थ्यांनी काही पुस्तकांचे वाचनही केले. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री करण्याची आणि नियमित वाचनाची प्रेरणा त्यांना मिळाली.
कार्यक्रमाचे संचालन सुनीता खुसपुरे यांनी केले. शुभम कडू यांनी प्रास्ताविक केले, तर भारती वानखेडे यांनी आभार मानले. शाळेतील शिक्षकवृंद तसेच नगर वाचनालयाचे कर्मचारी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. त्यानंतर भारती वानखेडे यांनी सुमधुर गीत सादर केले. गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

