Type Here to Get Search Results !

लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची वणी डाक कार्यालयाला शैक्षणिक भेट

 


वणी : 


         राष्ट्रीय डाक सप्ताहानिमित्त देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी वणी येथील पोस्ट ऑफिसला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाचे कार्य, टपाल तिकिटांचे महत्त्व तसेच पोस्ट ऑफिसच्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय डाक सप्ताहातील ‘फन विथ फिलॅटली डे’ (Fun with Philately Day) या टपाल तिकीट संग्रहाविषयी जनजागृती करणाऱ्या दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


             राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये टपाल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांविषयी जनजागृती केली जाते. याच उद्देशाने विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसच्या कामकाजाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.


             या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसच्या कामकाजाविषयी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. टपाल तिकिटांचा संग्रह कसा केला जातो, त्यांचे महत्त्व काय आहे, तसेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.


 व्यावहारिक ज्ञानासाठी क्षेत्रभेट उपक्रम महत्त्वाचे — प्रशांत गोडे


         यावेळी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे म्हणाले, “पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. अशा क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांच्यात जिज्ञासा निर्माण होते.


       पोस्ट ऑफिस वणीचे अधिकारी, डाक निरीक्षक सुधीर कारंजकर, पोस्टमास्तर जयप्रकाश बलकी, पोस्टल सहाय्यक गजानन चोपडे, मेल व्हरसिअर पंकज दुमोरे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “ टपाल तिकीटांचा संग्रह केवळ छंद नसून, टपाल तिकिटे ही देशाचा इतिहास, थोर पुरुषांची ओळख आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहेत. विद्यार्थ्यांनी टपाल तिकिटांचा संग्रह करण्यासोबतच पोस्ट ऑफिसच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती करून घ्यावी” असे आवाहन त्यांनी केले.


        या शैक्षणिक भेटीप्रसंगी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्यासह वणी पोस्ट ऑफिसचे अधिकारी, कर्मचारी शाळेतील शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी जनार्दन बोकडे, भावना सिडाम तसेच शाळेतील शिक्षकवृंदाने सहकार्य केले. भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे पुडे देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image