Type Here to Get Search Results !

चैतन्य ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे ज्येष्ठांचा सत्कार कायदेविषयक व आरोग्य मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न


 वणी : 


       चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक भवन, छोरीया लेआउट, गणेशपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अतिज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच कायदेविषयक, आरोग्यविषयक आणि योगविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.


             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. उदयराव गोहोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. पांडुरंग वऱ्हाटे, श्री. सुरेश मांडवकार, श्री. सुधाकरराव गारघाटे व डॉ. कपिल उदयराव गोहोकार उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून योगप्रशिक्षक डॉ. गजानन अघळते, तालुका विधी सेवा समितीचे ॲड. दादा ठाकूर व ॲड. पूजा मत्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत विविध शाळांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अतिज्येष्ठ नागरिक श्री. मारोती सदाशिव मोहितकार व श्री. लक्ष्मण नारायण उलमाले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


                यावेळी ॲड. दादा ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७ याबाबत माहिती देत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी कायदेशीर संरक्षण व मोफत सल्ला आणि मार्गदर्शनाच्या तरतुदी असल्याचे सांगितले. ॲड. पूजा मत्ते यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदी, मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.


           डॉ. कपिल गोहोकार यांनी ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी व दीर्घायुषी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, जीवनसत्त्व डी व कॅल्शियमची आवश्यकता तसेच पायांचे स्नायू मजबूत ठेवण्यासंदर्भात आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.


          डॉ. गजानन अघळते यांनी ‘आनंदाची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करताना मन व शरीराची योग्य मशागत करणे, स्वतःची ओळख व कर्तव्यांचा शोध घेणे, वर्तमानकाळात जगणे, अहंकार टाळणे आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अष्टांग योगातील यम-नियमांचे पालन करून नियमित प्राणायाम व ध्यान करण्याचे आवाहन केले.


         कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रामदास बोढे यांनी केले. श्री. नानाजी विधाते यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. लक्ष्मण इद्दे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचा परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image