Type Here to Get Search Results !

डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा विक्रमी षटकार रघुवंशम् लेख मालिकेची एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद


 वणी : 


          लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्रात १७ डिसेंबर २०२३ रोजी सुरू केलेल्या आणि नित्य स्वरूपात प्रकाशित होत असलेल्या महाकवी कालिदास विरचित रघुवंशम् या महाकाव्यावरील सलग १००० लेख प्रकाशित झाल्याबद्दल, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रम स्वरूपात नोंद करण्यात आली आहे. 


         डॉ. स्वानंद गजानन पुंड यांच्या या नवीन विक्रमाच्या निमित्ताने त्यांचा विक्रमाचा एक उत्तुंग षटकार पूर्ण झालेला आहे. यापूर्वी २१ ग्रंथात्मक श्री गणेश उपासना ग्रंथ मालिकेसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराजांच्या स्तोत्र वाङ्मयावर लिहिलेल्या सलग ३८१ लेखांसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गीर्वाण वाणी या यूट्यूब चैनल वर प्रसारित करण्यात आलेल्या संस्कृत साहित्य वरील सलग ३६९ व्हिडिओ साठी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सार्वजनिक माध्यमावर श्री गाणेश्वरी मनोबोध या विषयावर प्रसारित सलग २२२ लेखांसाठी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि याच रघुवंशम् मालिकेच्या पाचशे भागांच्या प्रसारणासाठी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावावर पाच विक्रमांची नोंद असून आजचा हा सहावा विक्रम याच अर्थाने विक्रमी षटकार ठरत आहे. 


             सलग १००० भाग प्रसारित झाल्यानंतर देखील आणखी सुमारे दीड वर्ष ही लेखमालिका चालू राहणार आहे. प्रत्येक सर्गाच्या श्लोकांचे संकलन जळगाव येथील अविरत प्रकाशनाच्याद्वारे पुस्तक रूपात प्रकाशित होत असून असे आजपर्यंत ११ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. याच स्वरूपात एकूण १९ ग्रंथ प्रकाशित होतील यावरून आपल्याला या उपक्रमाच्या व्यापकतेचा अंदाज येऊ शकेल. 


          प्रकाशित ९७ ग्रंथ, ३० वर ई-बुक, ६००० च्या वर वृत्तपत्रीय लेख, ५००० वर व्याख्यान आणि प्रवचने, विविध मान्यवर संस्थांचे ३० वर वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवर शेकडो प्रसारणे, जगभरातील गणेश भक्त आणि संस्कृत अभ्यासकांच्या नित्य वृद्धिंगत प्रतिसादाने युक्त असणारे ८०० च्या वर व्हिडिओ, संपूर्ण ऑनलाइन आणि पूर्णतः निःशुल्क स्वरूपात तयार करण्यात आलेल्या, विविध विद्यापीठांनी मान्यता प्रदान केलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या मालिका, अशा सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या त्यांच्या कार्याच्या गौरवात या विक्रमाच्या निमित्ताने एका नवीन शिरपेचा ची भर पडली आहे.


         या वैशिष्ट्यपूर्ण विक्रमाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image