मनसे आयोजित भव्य गरबा महोत्सव - २०२६ मध्ये पहिल्यांदाच वणी शहरात 'ग्रँड मस्ती' फेम प्रसिद्ध अभिनेत्री कायनात अरोरा उद्या वणीत हजेरी लावणार असून, या सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दांडियाचा ठेका, धम्माल संगीत आणि सेलिब्रिटीची जादू एकाच मंचावर अनुभवण्याची सुवर्णसंधी वणीकरांना मिळणार आहे. आगामी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी बरोबर ६:०० वाजता राम शेवाळकर परिसर, वणी येथे या महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने एक अत्यंत भव्य आणि संस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे पक्षनेते मा. राजू उंबरकर आणि वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा यांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या गरबा महोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार असून, वणीकरांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तरुणाईसह माता-भगिनी आणि सर्वच वयोगटातील नागरिक या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दांडिया खेळण्यासाठी आणि संगीताच्या तालावर ठेका धरण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.

