स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथमच पाळीव प्राण्यांचे अनोखे प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, प्राण्यांप्रती संवेदनशीलता आणि त्यांच्या संगोपनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध पाळीव प्राण्यांना सहभागी करून घेतले. यामध्ये कुत्रा, मांजर, ससा यांसह विविध पाळीव प्राण्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांची आकर्षक सजावट व वेशभूषा केली होती. त्यामुळे प्रदर्शनाला उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले.
प्रदर्शनादरम्यान पाळीव प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे व नियमांचे पालन करण्यात आले. प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल माहिती देत त्यांच्या आहार, आरोग्य, स्वच्छता आणि संगोपनाविषयीही उपस्थितांना माहिती दिली.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या पाल्यांनी पाळीव प्राण्यांची केलेली काळजी, त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि प्रदर्शनातील सहभाग पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेचे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सहभागाचे कौतुक केले. तसेच प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळेतील सर्व कर्मचारी यांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेमासोबतच जबाबदारीची भावना, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले हे पाळीव प्राणी प्रदर्शन संस्मरणीय ठरले.


