स्वर्गीय नत्थू घुलारामजी वासेकर तथा स्वर्गीय रूपाली प्रमोद वासेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मानकी येथे मागील पंधरा वर्षांपासून सार्वजनिक तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचा तान्हा पोळा उत्सवही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.
यावेळी तब्बल १०१ नंदीबैलांसह बालगोपालांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेतील १५ बालगोपाल, ७ गुढीधारक तसेच विविध देखाव्यांमध्ये १० बालगोपालांनी सहभाग नोंदविला. नंदीबैलांची आकर्षक सजावट आणि बालगोपालांच्या विविध वेशभूषांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाला वसंत जिनिंगचे अध्यक्ष तथा मानकीचे भूमिपुत्र प्रमोद वासेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रमोद वासेकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गावातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबतच बालगोपालांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाला त्यांनी उपस्थित राहून पाठबळ दिले.
बक्षीस वितरण समारंभात वणीचे ठाणेदार भानुदासजी पिदूरकर, पोलीस उपनिरीक्षक शेखरजी वांढरे, मानकीचे भूमिपुत्र रामचंद्रजी खिरेकर तसेच वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर यांच्या हस्ते सहभागी बालगोपालांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
मानकीच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा करून सहभागी प्रत्येक बालगोपालाला प्रोत्साहनपर बक्षीस दिले. यंदा नंदीबैल सजावट, पारंपरिक वेशभूषा, शेतकरी देखावे आणि गुढीधारक या विविध प्रकारांसाठी जवळपास ३० हजार रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली.
ग्रामीण भागातील पारंपरिक सण आणि संस्कृतीचे जतन करत बालगोपालांमध्ये आपल्या परंपरांविषयी अभिमान निर्माण करणारा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला. सामाजिक बांधिलकी आणि गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपत प्रमोद वासेकर यांची या उपक्रमातील उपस्थिती ग्रामस्थांसाठी विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास काकडे, तुलसीदास नागपुरे, नगो बोर्डे, शंकर माहुरे, प्रवीण पुरी, शंकर वासेकर, वैभव गौरकर, आशिष ठेंगणे, शुभम नागपुरे, नेहा मांढरे, आकाश माहाडोळे, शंकर खुसपुरे, विठ्ठल गाऊत्रे, प्रथम वासेकर, महेश पुरी तसेच समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


