Type Here to Get Search Results !

समाजसेवा, राजकारण आणि जनहिताचा ध्यास; विजयबाबूंच्या कार्याचा बहुआयामी प्रवास


 वणी : 


        औषधीनिर्माणशास्त्रातील बी. फार्मची पदवी संपादन करतानाच राजकारण आणि समाजकारणाची वाट धरलेल्या विजयबाबूंनी गेल्या अनेक वर्षांत विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे निराकरण करण्याची हातोटी, सूक्ष्म निरीक्षण, सखोल अभ्यास आणि सातत्याने पाठपुरावा ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात.


           विजयबाबूंच्या सामाजिक जडणघडणीत कुटुंबीयांचे संस्कार महत्त्वाचे ठरले. त्यांचे आजोबा प्रेमराजजी चोरडिया हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. 1932 मध्ये महात्मा गांधी वणी येथे आले असताना प्रेमराजजींना त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. त्यांनी वणी नगरपालिकेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. त्यांचे वडील पारसमलजी हे व्यापारी असले तरी सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान होते. या संस्कारांतून विजयबाबूंच्या व्यक्तिमत्त्वाची घडण झाली.


         अत्यंत संवेदनशील स्वभावाचे विजयबाबू अन्याय आणि अत्याचार सहन करत नाहीत. शांत व संयमी व्यक्तिमत्त्व असले तरी अन्यायाविरुद्ध ते आक्रमक भूमिका घेतात. ‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


          वणी परिसर कोळसा खाणींनी व्यापलेला असून येथील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी विजयबाबूंनी सातत्याने आवाज उठवला आहे. कामगारांच्या समस्यांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्यांनी निवेदनही दिले होते. समस्या समोर आल्यानंतर ती सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.


          कर्मयोगी गाडगेबाबांच्या दशसूत्रींवर त्यांची श्रद्धा असून त्यानुसार विविध सामाजिक उपक्रम ते राबवतात. दरवर्षी उन्हाळ्यात वैयक्तिक पातळीवर पाणपोई चालविणे, सामूहिक विवाह मेळावे आयोजित करणे, गरजूंना भेटवस्तू देणे, तसेच जैताई मंदिर परिसरात स्वखर्चाने स्वच्छतागृह उभारणे, अशा विविध उपक्रमांतून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय येतो.


       विजयबाबूंचा राजकारणातील प्रवेशही काहीसा अनपेक्षित होता. शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीपत्रावर थोरल्या भावाऐवजी त्यांचे नाव चुकून आले. मात्र मिळालेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. श्रीकृष्ण जन्माष्टमी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे नियोजनबद्ध आयोजन केले जाते.


       2004 मध्ये भारतीय जैन संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच कोलवॉशरी वर्कर्स युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष, रामलाठी आखाड्याचे सल्लागार, बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.


       2016 मध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक म्हणून संघटनात्मक कामकाजात सक्रिय आहेत.


           आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे. वणी परिसरातील आरोग्याच्या प्रश्नांबाबत ते सातत्याने पुढाकार घेतात. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन, गरजू रुग्णांच्या निवास, भोजन, उपचार आणि औषधांचा खर्च, अपंगांना तीनचाकी सायकली तसेच कर्णबधिरांना श्रवणयंत्रांचे वाटप, मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत, असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. कोरोना काळातही त्यांनी गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली असून कोरोनायोद्ध्यांचा सत्कार व आर्थिक मदत केली.


          विजयबाबूंच्या सामाजिक कार्याची व्याप्ती धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही दिसून येते. जैताई देवस्थान, रंगनाथ स्वामी मंदिर, डॉ. आंबेडकर चौकातील दुर्गा मंदिर, जंगलाचा मारुती मंदिर, अमृत भवन हनुमान मंदिर तसेच कोलगाव येथील संत जगन्नाथ महाराज मंदिराला त्यांनी मदत केली आहे. भांदेवाडा येथील संत जगन्नाथ महाराजांच्या दमणीसाठी त्यांनी 22 किलो चांदी अर्पण केल्याचे सांगितले जाते. वंदे भारत कार्यक्रम तसेच तिरंगा रॅलीसारख्या उपक्रमांतही ते सक्रिय सहभाग घेतात.


         शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सामाजिक सहभाग मोठा आहे. आतापर्यंत सुमारे 350 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. अनोळखी व बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही ते पुढाकार घेतात. पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी वणी येथे आलेल्या एनडीआरएफच्या चमूच्या व्यवस्थेतही त्यांनी सहकार्य केले.


         कामगार आणि शेतकऱ्यांविषयी विजयबाबूंना विशेष जिव्हाळा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत ते सातत्याने चिंता व्यक्त करतात. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ते सक्रिय असतात. राजकारणात राहूनही नैतिकता जपल्यामुळे राजकीय विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराचे स्थान असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.


         बुद्धिबळ आणि क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ आहेत. कामाचा व्याप वाढल्याने या छंदांसाठी वेळ कमी मिळत असला तरी वाचन आणि संगीत ऐकण्याचा छंद त्यांनी कायम जोपासला आहे. ज्ञानी व गुणीजनांचे ते मुक्तकंठाने कौतुक करतात.


          तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी हा त्यांचा जन्मदिवस मानला जातो, तर 4 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाची प्रेरणा घेत सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गीतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणत समाजसेवा आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या विजयबाबूंना जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.


            – सुनील इंदुवामन ठाकरे

             मो. 8623053787

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad