कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश मा. धनकसार यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नातून कायर येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समता फाउंडेशन व महात्मे नेत्र रुग्णालय, नागपूर यांच्या सहकार्याने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, कायर येथे हे शिबिर होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सरपंच नागेश धनकसार यांनी हा उपक्रम पुढे नेला आहे. शिबिरात नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. तपासणीमध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर महात्मे नेत्र रुग्णालय, नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ने-आण, राहण्याची व जेवणाचीही मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमासाठी सरपंच नागेश मा. धनकसार यांनी ग्रामपंचायत सदस्य व मित्र परिवाराच्या सहकार्याने विशेष नियोजन केले आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
कायर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होऊन या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच नागेश मा. धनकसार यांनी केले आहे.


