केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारे मारेगाव येथील हेमंत बुजाडे यांचा सिद्धार्थ वसतिगृह, वणी यांच्या वतीने शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या त्यांच्या यशामुळे वसतिगृहातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. एस. सोनारखन, नवनाथ नगराळे, प्रा. बाळासाहेब राजूरकर आणि जगदीशजी भगत उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष प्रा. एस. एस. सोनारखन तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हेमंत बुजाडे यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना हेमंत बुजाडे यांनी आपल्या यशामागे जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्य यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता ध्येय निश्चित करून सातत्याने अभ्यास केला, तर UPSC सारख्या कठीण परीक्षेतही यश मिळविणे शक्य आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रा. एस. एस. सोनारखन आणि प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी मनोगत व्यक्त करून हेमंत बुजाडे यांच्या यशाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी हेमंत बुजाडे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या