येथील लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित,लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,च्या वतीने देशमुखवाडी येथे दिनांक ५ सप्टेंबर, शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्ती गौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी शाळेत अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिपाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षिकेची जिल्हा परिषद शाळेत पवीत्र पोर्टल द्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार होते. यावेळी लायन्स स्कूलचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर व विश्वस्त लायन महेंद्र श्रीवास्तव व पुरूषोत्तम खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे व पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ या गुरुस्तवनाने करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देवी सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व भगवान गोपाळ कृष्ण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमातील मुख्य भाग असलेल्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात शाळेसाठी अनेक वर्षे योगदान देणारे शिक्षक रवींद्रनाथ जनार्दन लिचोडे,राजू प्रल्हाद पाटील, गणेश हिरामण कोल्हे व कर्मचारी राजू देवगडे, श्रीमती मंदाताई बिपल्लीवार,सौ कोकिळा कडू यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या सेवाकाळांत शाळेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याची यावेळी कृतज्ञतेने आठवण करण्यात आली. याचबरोबर कु.सपना मधुकर ढवस यांची यवतमाळ जिल्हा परिषद शाळेत निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्तींनी श्री पाटील व लिचोडे यांनी आपल्या मनोगतांतून सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. संस्थेने दिलेले सहकार्य, सहकाऱ्यांशी निर्माण झालेले ऋणानुबंध तसेच विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा उल्लेख करत त्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्था, सहकारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
यावेळी विश्वस्त महेंद्र श्रीवास्तव यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या दीर्घ सेवेला सलाम केला. अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारा मार्गदर्शक असल्याचे सांगितले. प्राचार्या चित्रा देशपांडे यांनीही शाळेच्या प्रगतीमध्ये शिक्षकांसोबतच कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करतांना “सेवानिवृत्ती हा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे. संस्थेसाठी आपण दिलेली सेवा आणि योगदान सदैव स्मरणात राहील. आता पुढील आयुष्य आनंदाने, निरोगीपणे आणि समाधानाने जगा,” अशा प्रेरणादायी शब्दांत त्यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशी ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी आणि संस्थेसाठी दिली, त्यांच्या कार्याचा सन्मान करून लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलने कृतज्ञता, संस्कार आणि सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा जपली. सेवानिवृत्तीचा हा सोहळा उपस्थितांसाठी भावनिक तसेच प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.मृणाल चोधरी व सौ.शेहजीन शेख यांनी केले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सेवानिवृत्ती व सत्कार कार्यक्रमाची सांगता झाली.










टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या