बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि पालकांसह नागरिकांना आनंदाचा क्षण अनुभवता यावा, या उद्देशाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी शासकीय मैदान, वणी येथे भव्य तान्हा पोळा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भरभरून प्रतिसाद दिला.
तान्हा पोळ्यानिमित्त लहान बालकांनी विविध आकर्षक व कल्पक देखाव्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बालकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल २७ सायकलींसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे बालकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेचे आयोजन एकूण चार गटांमध्ये करण्यात आले होते. प्रत्येक गटातील विजेत्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ॲड. कुणाल चोरडिया, सौ. ख्याती चोरडिया तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, पावसाळी वातावरणाची पर्वा न करता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला. बालकांचे विविध कलाविष्कार पाहण्यासाठी पालकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बालकांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद मिळत होती.
बालकांना केवळ स्पर्धेत सहभागी करून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. बक्षिसांच्या माध्यमातून बालकांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण व्हावी तसेच भविष्यात त्यांनी विविध क्षेत्रांत प्रगती करावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे परीक्षक, पालक, बालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे ॲड. कुणाल चोरडिया यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे वणी शहरात दिवसभर आनंदाचे, उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.


