Type Here to Get Search Results !

“ज्या शाळेत शिकले, त्याच शाळेत मिळाला मोठा सन्मान, कोलगावात भावनिक क्षण!”


 मारेगाव : 


        शिक्षक दिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांसह नवनियुक्त केंद्र समन्वयक आणि केंद्रप्रमुखांचा दिमाखदार सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


           कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कु. कल्याणी नागरकर, कु. आर्या गौरकार, कु. लावण्या लोडे, तन्मय चिट्टलवार, कु. लक्ष्मी पारखी आणि कु. चैताली बोबडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. भारतीय संविधानाची प्रत, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


         याचवेळी केंद्र समन्वयकपदी निवड झालेल्या कोलगाव येथील शिक्षक विजय घोडमारे व प्रवीण बेहेरे तसेच शाळेचे केंद्र समन्वयक चिनू निरंजने यांचाही सन्मान करण्यात आला. कोलगावच्या सरपंच सौ. अभिषा निमसटकर आणि ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मंगला उमरे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.


             यावेळी ग्रामशिक्षण समितीचे शिक्षणतज्ज्ञ राजू निमसटकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना, शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धात्मक व डिजिटल युगात केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांच्या मनात आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.


        सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही याच शाळेत शिक्षण घेऊन मोठे झालो आहोत. त्यामुळे आपल्या गावाप्रतीची आणि समाजाप्रतीची जबाबदारी ओळखून शैक्षणिक क्षेत्रात कोलगावचा विकास साधण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


        ग्रामपंचायत आणि ग्रामशिक्षण समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ग्रामशिक्षण समितीचे राजू निमसटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल शंबरकर सर यांनी केले, तर पैकूजी आत्राम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad