शहरातील Macaroon Students Academy and Jr. Science College, वडगाव, वणी या संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, शाळेच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक कामांची शिक्षण विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल तपासणी करावी, अशी मागणी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात मॅकरून शाळेचा UDISE क्रमांक 27141415331 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा क्रमांक वडगाव रोड येथील शाळेसाठी असल्याचे दिसून येत असताना, इतर विविध ठिकाणीही संस्थेचे शैक्षणिक कामकाज सुरू असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली आहे किंवा नाही, तसेच सादर करण्यात आलेला तपासणी अहवाल प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेने आपले ठिकाण बदलले असल्यास जुन्या ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक कामकाजाचे स्वरूप आणि त्याला कोणत्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली, याचीही चौकशी करण्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच शाळेच्या इमारतीसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक कामांसाठी आवश्यक त्या शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची तपासणी करावी. एकाच UDISE क्रमांकावर विविध ठिकाणी विद्यार्थी दाखविले जात आहेत का आणि त्याआधारे शासनाकडून अनुदान अथवा इतर शासकीय लाभ घेतले गेले आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या चौकशीत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधित संस्था अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.
या प्रकरणी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ, शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण), अमरावती विभागाचे उपसंचालक, वणी नगर परिषद, जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत.
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित बाब असल्याने केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती तपासावी. चौकशीत दोष किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी,” अशी मागणी प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या