लालपुलिया परिसरातील कोळसा वाहतूक, वाहतुकीच्या समस्या आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी पोलीस ठाण्यात कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ढाबा चालक तसेच अन्य व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली.
लालपुलिया परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रस्त्यावर माती साचणे, धुळीचा त्रास, वाहतुकीला अडथळा तसेच नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रस्त्यावर साचलेली माती तातडीने साफ करण्याच्या सूचना आमदार देरकर यांनी संबंधितांना दिल्या. तसेच वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ब्रेकरची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.
कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांमधून कोळसा रस्त्यावर पडू नये आणि धुळीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे बंधनकारक असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. प्लॉटधारकांनी ताडपत्री व्यवस्थित बांधल्याची खात्री केल्यानंतरच ट्रक बाहेर सोडावेत, अशा सूचना देण्यात आल्या. संबंधित ट्रकची बिल्टी त्याच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले.
“व्यवसाय करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम समज द्यावी. मात्र, समज देऊनही वारंवार नियमभंग होत असेल तर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. कोळसा वाहतूक सुरू राहणे आवश्यक असले तरी त्याचा त्रास नागरिकांना होता कामा नये,” असे आमदार संजय देरकर यांनी स्पष्ट केले.
परिसरातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. पोलीस प्रशासन, कोळसा प्लॉटधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी परस्पर समन्वय ठेवून वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, ठाणेदार भानुदास पिदुरकर, ट्राफिक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह गणपत लेडांगे, अजय ढोबे, मनीष बत्रा आदी उपस्थित होते. लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट मालक, ढाबा चालक व अन्य व्यावसायिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या