रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्नेहबंध, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजुटीचा संदेश देण्यासाठी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. किरण देरकर यांच्या पुढाकाराने वणी येथे रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राखी बांधून भेटवस्तू देण्यात आल्या.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्पर विश्वास, संरक्षण, जबाबदारी आणि आपुलकीचा स्नेहबंध दृढ करणारा दिवस आहे, असे सौ. किरण देरकर यांनी सांगितले. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा कुटुंबाचा एक भाग असून, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षाचे काम केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे. महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, स्वच्छता अभियान तसेच रोजगार व मार्गदर्शन शिबिरे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौ. किरण देरकर यांनी केले.
“समाजाच्या अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” असे सांगत प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात समाजोपयोगी कामाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रक्षाबंधनाच्या स्नेहबंधाचा धागा संघटनात्मक एकजुटीशी जोडत पक्ष संघटना बूथपासून गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संजय निखाडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, सुनील कातकडे, संतोष कुचनकर, पुरुषोत्तम बुट्टे, विनोद दुमणे, महेश सोमलकर, तुलसी तेवर यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख सौ. डिमनताई टोंगे, ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हाप्रमुख सरपंच सौ. गीताताई उपरे, महिला तालुकाप्रमुख सौ. सुरेखाताई ढेंगळे, महिला तालुकाप्रमुख मारेगाव सौ. इंदूताई किन्हेकार, महिला तालुका सचिव सौ. पौर्णिमाताई राजुरकर, तालुका संपर्क प्रमुख झरी सौ. ममताताई पारखी, सौ. छबुताई आसूटकर, अमीनाजी पठाण, महिला शहरप्रमुख सौ. सविताताई गुलाबराव आवारी, माजी पंचायत समिती सदस्य सौ. चंदाताई मुन, माजी नगरसेविका सौ. कीर्तीताई देशकर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, नगरसेविका सौ. कांचनताई देरकर, सौ. प्रणाली ताई देवाळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई देठे, माजी नगरसेविका सौ. जिजाताई वरारकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेणूताई झोडे, सौ. मंजूताई इनामे व वर्षाताई पोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. किरण देरकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमातून स्नेहबंध, संघटनात्मक एकजूट आणि समाजसेवा यांची त्रिसूत्री अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या