Type Here to Get Search Results !

ग्रंथालय हे संस्कार देणारे क्षेत्र — सुरेंद्र विधाते


वणी :


       ग्रंथालय हे केवळ पुस्तके उपलब्ध करून देणारे केंद्र नसून संस्कार देणारे क्षेत्र आहे. ग्रंथांमुळे व्यक्तीच्या विचारांना दिशा मिळते. त्यामुळे ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे. या क्षेत्रातही अनेक अडचणी व संघर्ष आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटित असणे आवश्यक आहे. ग्रंथ सर्वांवर संस्कार करतात. ‘वाचाल तर वाचाल’ हे त्रिकालाबाधित सत्य असून वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य संघटना करत आहे, असे प्रतिपादन वणी, मारेगाव, झरी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुरेंद्र विधाते यांनी केले.



       सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे, उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले व सचिव प्रमोद लोणारे उपस्थित होते.



       विधाते पुढे म्हणाले की, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असून त्यावर सकारात्मक तोडगा निघणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्यासोबतच ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठीही योगदान दिले पाहिजे. यावेळी त्यांनी संघटनेच्या विविध कार्यांवरही प्रकाश टाकला.



        उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच विविध स्तरांवरून कर्मचारी संघटनेच्या वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम केल्यास संघटनेला अधिक बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.



         साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे यांनी स्थानिक ग्रंथ चळवळीवर भाष्य केले. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे आणि प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. वाचनाची सवय वाढविण्यासाठी ग्रंथालयांनी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत ग्रंथालय संघटनेच्या अनुषंगाने विविध विषयांवर प्रकाश टाकला.



     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कोषाध्यक्ष शुभम कडू यांनी संघटना निर्माण करण्याची गरज, संघटनेने केलेले कार्य यांची पार्श्वभूमी सांगितली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रमोद लोणारे तर उपस्थितांचे आभार संघटक गजानन कोकुडे  यांनी मानले. 



     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहसचिव सुभाष राखुंडे, सहसंघटक अरविंद दुधलकर, संघटनेचे सदस्य राम मेंगावार आणि अमोल पेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 



        यावेळी नगर वाचनालय वणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय वणी, सिद्धी वाचनालय वणी, विवेकानंद वाचनालय कुंभा तसेच रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालय वणीचे ग्रंथपाल व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



       वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती जोपासण्याचा आणि ग्रंथालय चळवळीला अधिक बळ देण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad