शहरातील स्वामी समर्थनगर परिसरातील एका घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत अंदाजे २५० ग्रॅम वजनाचे जुने चांदीचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग सर यांच्या घरी भाड्याने राहणारे पियुष रमेशचंद चोरडिया (वय २८) हे कुटुंबीयांसह २१ ऑगस्ट रोजी दुपारी नागपूर येथे गेले होते. घराला कुलूप लावून कुटुंबीय बाहेर गेले होते.
दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता पियुष यांचे वडील रमेशचंद चोरडिया घरी परतले. यावेळी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने उचकटल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच आलमारीचे लॉकर तोडलेले आढळून आले.
आलमारीतील जुने पैंजण, बिछिया, चांदीच्या अंगठ्या आदी मिळून अंदाजे २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. त्यांची अंदाजे जुनी किंमत १५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच घरातील आजीच्या खोलीतील सामानही अस्ताव्यस्त असून लोखंडी कपाट तुटलेल्या अवस्थेत आढळले. आजी सध्या चातुर्मासानिमित्त नागपूर येथे असल्याने त्यांच्या कपाटातून नेमके काय चोरीला गेले, याची माहिती त्या परतल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पियुष चोरडिया यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उचकटून चोरी केल्याचे सांगितले आहे. प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या