इतर कौशल्यांप्रमाणेच लेखनकौशल्यही नियमित सरावातून विकसित करता येते. लेखनकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वाचणे आवश्यक असून, वाचनाशिवाय लेखनकौशल्य विकसित करणे अवघड आहे, असे प्रतिपादन मुक्तलेखक, निवेदक व वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टद्वारा संचालित मारेगाव तालुक्यातील स्व. लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात आयोजित ‘वक्तृत्व आणि लेखनकौशल्य’ कार्यशाळेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नहाते होते. यावेळी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे विश्वस्त प्रा. कुंतलेश्वर तुरविले, शिक्षक देवेंद्र पोल्हे, वीणा निब्रड, अमित मोघे आदी उपस्थित होते.
सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना लेखनकौशल्याचे मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमातील विविध लेखनप्रकार आणि त्यातील बारकावे त्यांनी समजावून सांगितले. बातमीलेखन व प्रमाणलेखनाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच विरामचिन्हे, प्रत्यय, जोडाक्षरे, वाक्यरचना आदी लेखनाच्या तांत्रिक बाबी सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या.
विद्यार्थ्यांना लिखाण करताना नेहमी येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करत त्यांनी प्रत्यक्ष लेखनाच्या माध्यमातून विविध बारकावे स्पष्ट केले. अभ्यासक्रमातील बातमीलेखन, निबंधलेखन, पत्रलेखन, जाहिरातलेखन, सारांशलेखन आदी विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक सुरेश नहाते यांनी विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य कार्यशाळेचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे विश्वस्त प्रा. कुंतलेश्वर तुरविले यांनी प्रशिक्षकांचा परिचय करून देतानाच कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शालेय व शालाबाह्य उपक्रमांची माहिती दिली.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. किशोर मोघे यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी दिनेश कुमरे, प्रवीण वनकर, चंद्रशेखर राठोड, छत्रपती उईके, शंकर राठोड, प्रमोद बनकर, सुनील आसेकर व संदीप भगत यांनी सांभाळली.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या