ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या रूट मार्चदरम्यान चार गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन मालवाहू वाहनांवर शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चार बैलांसह दोन अशोक लेलँड मालवाहू वाहने असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ग्राम कायर येथे रूट मार्च पूर्ण करून पोलिसांचे पथक शिरपूर पोलीस ठाण्याकडे परत येत असताना ग्राम चारगावजवळ दोन मालवाहू वाहने भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांना पाहून वाहनांनी वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने संशय आल्यावर पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान MH 29 CM 1157 आणि MH 29 CM 0664 या दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी दोन, असे एकूण चार बैल आढळून आले. जनावरांना वाहनांमध्ये कोंबून निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी शनिदेवा शिवशंकर पांडे (वय २५), बादल खुशाल नगराळे (वय २२), रंजीत सुभाष कनाके (वय ३०) आणि साहील बंडू खोके (वय २१) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित बैल वरोरा येथून खरेदी करून कत्तलीसाठी तेलंगणातील बेला येथे सलीम कुरेशी याच्याकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी चारही बैलांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना गुरु गणेश गोसंरक्षण सेवाभावी संस्था, रासा, ता. वणी येथे दाखल केले.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारणा २०१५), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०, मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली.
या कारवाईमुळे गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, शिरपूर पोलिसांच्या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या