गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर तसेच नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ६०५ गुण प्राप्त करणारे आवेश उपरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
आजच्या युगात स्पर्धा अत्यंत कठीण झाली आहे. अशा परिस्थितीत चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर आवेश उपरे यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. भविष्यात डॉक्टर बनून त्यांनी गोरगरीब व गरजूंची सेवा करावी आणि समाजाचे ऋण फेडावे, असे मत पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनांपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र कोरडे होते. यावेळी सत्कारमूर्ती पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, आवेश उपरे व जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे, तसेच अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य विजया दहेकर व जयवंत पारखी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राजुरकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले, तर आभार भास्कर सोमलकर यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ समाजसेवक, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच गुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देविदास शेटे, पुंडलीक धोबे, संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर, शंकर किनाके, नाना बदखल, भय्याजी तेजे, भास्कर पत्रकार, प्रकाश कुचणकर, विजय येसेकर, हरिभाऊ भट, अनिल बेलेकर, चंद्रशेखर दहेकर, शारदा बलकी, माया रासेकर, रज्जू पारखी, विनोद खापणे, प्रभा आसेकर, सिंधू गिरडकर, बेबी दानव, वृंदा पाटेकर, रजनी वकलकर, गीता झुरमुरे, मंगला डुंबरे, चंद्रकला तुराणकर व नाणीबाई ठेंगणे यांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या