वणी नगर परिषदेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास नगर परिषद कार्यालयात चटई अंथरून बसून अनोखे आंदोलन केले. या प्रकारामुळे नगर परिषदेत काही काळ चर्चेला उधाण आले.
विरोधी नगरसेवकांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्याबाबत रीतसर अर्ज सादर केला होता. त्यानंतर उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेली केबिन विरोधी पक्षाला देण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, महिला व बालकल्याण सभापतींना पदभार स्वीकारून सहा महिने उलटून गेले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध असतानाही राजकीय हेतूने सोनटक्के यांच्या रिक्त केबिनमध्ये त्यांचे कार्यालय हलविण्यात आले. संबंधित सभापतींनी कोणताही अर्ज न देता त्यांना केबिन उपलब्ध करून देण्यात आली, तर विरोधी पक्षाने रीतसर अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
"जोपर्यंत आम्हाला बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही याच केबिनसमोर चटईवर बसून आंदोलन सुरू ठेवू," असा इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला. या आंदोलनानंतर नगर परिषद प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या