स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक पर्व ठरलेल्या वणी येथील जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना मंगळवारी (४ ऑगस्ट) अभिवादन करण्यात आले. ४ ऑगस्ट १९३० रोजी झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघचालक हरिहर भागवत, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, विवेक पांडे आणि सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.
वणीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात जंगल सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. लोकनायक पद्मविभूषण डॉ. मा. श्री. (बापूजी) अणे यांच्या प्रेरणेने या आंदोलनाला दिशा मिळाली. वणीचे स्व. रा. गं. भागवत आणि चंद्रपूरचे डॉ. शंकरराव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह पार पडला. या आंदोलनात तत्कालीन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व. रवी करंदीकर (वकील), स्व. डॉ. या. श्री. अणे, स्व. भ. रा. सास्तीकर, स्व. गो. मु. अनुरकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
जंगल सत्याग्रहात दा. प्र. किटकुले, जयरामपंत इंगोळे, शामरावजी पांडे, नरसुजी ढवळे, व. पां. सैनिस, दौलतराव कळसकार, शंकरराव मारोटकर, बापुराव कापर्तीवार, नारायणराव उपाध्ये, प्रल्हादपंत देशपांडे, मु. वि. देशपांडे, नत्थुजी पानसरे, त्रिंबकराव देशपांडे, सत्यनारायण मिश्रा, मोहनलाल चोपडा, रा. ना. वैद्य, पां. का. पाटील, ग. कृ. ठाकरे, वसंतराव क्षीरसागर, यादवराव कमाविसदार, वामनराव देशपांडे, शंकरराव देशपांडे, माधवराव, कृष्णराव नागदेव, सांबशिव वंगाले, शंकरराव मगरे आदी स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख यावेळी कृतज्ञतेने करण्यात आला.
या ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती जतन करण्यासाठी वणी तालुका स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीच्या वतीने स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन ४ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ना. रा. भागवत, ब. ना. बोनगीरवार यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी अमूल्य ठेव असून, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. जिनेंद्र भंडारी, सागर जाधव, अंकुश भंडारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या