शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शालेय बसेस, व्हॅन व खासगी वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या म्हणण्यानुसार, शालेय वाहतुकीसाठी फिटनेस, जीपीएस, सीसीटीव्ही, फर्स्ट-एड बॉक्स, अग्निशामक यंत्र, केअरटेकर आदी सुरक्षा नियमांची अनेक वाहनांकडून पायमल्ली होत असून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.


