आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या उज्वला मेश्राम या मुलीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पाटील देरकर यांच्या पत्नी सौ. किरणताई संजय देरकर यांनी माणुसकीचा संवेदनशील आदर्श निर्माण केला. उज्वलाच्या शैक्षणिक खर्चासाठी त्यांनी आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला.
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त बाळापूर (बोपापूर) येथे उपस्थित असताना किरणताई देरकर यांच्या निदर्शनास उज्वला मेश्राम या मुलीला आई-वडिलांचे छत्र नसल्याची बाब आली. परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी उज्वलाला जवळ घेत प्रेमाने तिची विचारपूस केली. तिच्या शिक्षणाची व भविष्यातील परिस्थितीची माहिती घेत त्यांनी तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम संपल्यानंतरही दिलेला शब्द त्यांनी विसरला नाही. त्यांनी गावातील गौरवभाऊ पंधरे यांच्याशी संपर्क साधून उज्वलाबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर उज्वलाच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आर्थिक मदतीचा निर्णय घेतला.
दरम्यान, आज आमदार संजय पाटील देरकर यांच्या हस्ते उज्वला मेश्राम हिला शैक्षणिक खर्चासाठी रोख आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उज्वलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत, “तुझ्यावर कोणतेही संकट आले तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तू मन लावून शिक्षण घे, आयुष्यात मोठी हो, समाजात स्वतःचे नाव कमव आणि एक दिवस मोठी अधिकारी बन,” असा विश्वास किरणताई देरकर यांनी व्यक्त केला.
एखाद्या कार्यक्रमात दिलेला शब्द लक्षात ठेवून त्याची पूर्तता करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आणि परिस्थितीशी झुंज देणाऱ्या मुलीच्या शिक्षणाला आधार देणे, ही सामाजिक बांधिलकीची जिवंत उदाहरण ठरली आहे. किरणताई देरकर यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, उज्वला मेश्राम हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

