पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरल्याने ते सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता वाढते. याच काळात बेडूक, कीटक आणि इतर खाद्य मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने साप घराच्या परिसरात, अंगणात किंवा अडगळीत आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घेण्याचे आवाहन विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक व सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी केले आहे.
घरात किंवा परिसरात साप दिसल्यास त्याला त्रास देऊ नये अथवा मारण्याचा प्रयत्न करू नये. सर्पमित्रांची मदत घ्यावी. रात्री घराबाहेर, बाथरूम किंवा स्वच्छतागृहात जाताना प्रथम दिवा लावून परिसर पाहावा. रात्री चप्पल-जोडे घालताना ते तपासून घ्यावेत. अडगळीतील वस्तू काढताना हात न घालता काठी किंवा योग्य साधनांचा वापर करावा.
घरात लाकडे, सरपण, गोवऱ्या किंवा इतर अडगळ साठवू नये. घरातील छिद्रे, भेगा व फटी बुजवाव्यात. घराच्या भिंतीलगत लाकूड, विटा किंवा दगडांचे ढिग ठेवू नयेत. झाडांच्या फांद्या व वेली घरावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेतात काम करताना गमबूट वापरावेत. रात्री शेतात किंवा जंगल परिसरात जाताना टॉर्च आणि काठी सोबत ठेवावी.
गवताचा भारा, कडबा किंवा जनावरांचा चारा उचलण्यापूर्वी तो काठी किंवा योग्य साधनाने तपासावा. तण काढताना आधी परिसर हलवून पाहावा. टेंटमध्ये झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच परिसर स्वच्छ ठेवावा आणि उरलेले अन्न घराजवळ टाकू नये.
📌 साप चावल्यास काय करावे ?
साप चावल्याचा संशय आल्यास घाबरून धावू नये, उड्या मारू नयेत, सायकल चालवू नये किंवा जड वस्तू उचलू नयेत. शरीराची अनावश्यक हालचाल शक्यतो टाळावी आणि त्वरित सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे.
दंशाच्या ठिकाणी चिरा देणे, तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा कोणतेही अशास्त्रीय उपचार करू नयेत. सर्पदंशावर उपचारासाठी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात.
साप दिसल्यास किंवा सर्पदंश झाल्यास विदर्भ सर्पमित्र मंडळाच्या अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन गजेंद्र सुरकार यांनी केले आहे.
सर्पमित्र मंडळ कार्यालय : 9404891722, 9822219100
अभिनव : 7387423507
शिवम : 7719876666
वैष्णव : 8600564098
महेश : 8600857912



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या