वणी :
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप नाट्यगृहाचे लोकार्पण झालेले नसल्याने कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेली ही वास्तू वापराविना पडून आहे. त्यामुळे “रंगमंच सज्ज; पडदा कधी उघडणार?” असा सवाल वणीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
वणी शहराला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली असून शहरातील कलाकार, नाट्यप्रेमी, साहित्यिक, संगीत क्षेत्रातील व्यक्ती तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांना कार्यक्रमांसाठी सुसज्ज नाट्यगृहाची गरज आहे. मात्र, नाट्यगृह तयार असूनही ते नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध नसल्याने कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
या नाट्यगृहासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून उभारलेली वास्तू तयार असताना केवळ लोकार्पणाअभावी ती वापरात न आणणे हा सार्वजनिक निधीच्या योग्य वापराबाबत प्रश्न निर्माण करणारा प्रकार असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे. नाट्यगृह दीर्घकाळ बंद राहिल्यास देखभाल, सुरक्षा आणि इतर सुविधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
नाट्यगृहाची काही उर्वरित कामे, तांत्रिक बाबी किंवा आवश्यक सुविधा प्रलंबित असल्यास ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच लोकार्पणाची निश्चित तारीख जाहीर करून नाट्यगृह वणीकरांच्या सेवेत खुले करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
दरम्यान, नाट्यगृहासाठी मंजूर झालेला निधी, आतापर्यंत झालेला एकूण खर्च, कामाची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि लोकार्पणास होणाऱ्या विलंबाची कारणे याबाबत प्रशासनाने पारदर्शकपणे माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात निवेदन देताना नगरसेवक सुधीर थेरे, अजय धोबे, छत्रुगन मालेकर, अनिकेत बदखल, रसूल रंजरेज, सौ. प्रणाली देऊडकर, सौ. किरन देरकर तसेच इतर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
“नाट्यगृह ही केवळ इमारत नसून वणीच्या कलाकारांच्या स्वप्नांना व्यासपीठ देणारी सांस्कृतिक चळवळीची जागा आहे. तीन वर्षे प्रतीक्षा करूनही लोकार्पण न होणे योग्य नाही. प्रशासनाने आता आणखी विलंब न करता नाट्यगृह नागरिकांच्या सेवेत खुले करावे,” अशी भूमिका उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केली.
सार्वजनिक पैशातून उभारलेली वास्तू वापरात आणणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वणीच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाट्यगृहाचा पडदा आता तातडीने उघडला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

