वणी :
लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी येथे ८०वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत गोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गिताने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रंजू झाडे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला सौ. मृणाली ढुमणे पालक प्रतीनिधी व प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सौ. ढुमणे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत गोडे यांचे गुलाबांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित पालक व शिक्षकांनी कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, फॅन्सी ड्रेस, देशभक्तीपर गीत आणि नृत्ये सादर केल़ी. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणातून देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना दिसून आली. देशभक्तीपर गीत व नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली, तर फॅन्सी ड्रेसमधून विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तांच्या भूमिका साकारल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण पाहण्यासाठी उपस्थित पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या पाल्यांचे सादरीकरण पाहताना पालकांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अशा आशयाचे मनोगत सौ.ढुमणे व श्री. गोडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी आगलावे व मृणाली चौधरी यांनी सुरेखपणे केले. त्यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाची सांगड उत्साहपूर्ण पद्धतीने घातली.
शेवटी शैजिन शेख यांनी आभार प्रदर्शन केले.












टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या