Type Here to Get Search Results !

वक्तृत्वातून उमटला परिवर्तनाचा हुंकार, सानिका-आकाशने मारली बाजी


 वणी : 

         वक्तृत्वातून सामाजिक जाणीव जागविण्यासोबतच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रबोधनकारी विचारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वणी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिन विशेष वक्तृत्व स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, १६ ऑगस्ट रोजी खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृहात झालेल्या या स्पर्धेला शालेय तसेच खुल्या गटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



           शालेय गटातील विद्यार्थ्यांनी ‘वृक्षसंवर्धन ही काळाची गरज’, तर खुल्या गटातील स्पर्धकांनी ‘भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत : महात्मा ज्योतिराव फुले’ या विषयावर आपले विचार मांडले. विषयाचे गांभीर्य, प्रभावी मांडणी, वक्तृत्वशैली आणि विचारांची मांडणी यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांपासून तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महात्मा फुले यांच्या विचारांची आणि पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली.


          शालेय गटात सानिका चांदसूर्य हिने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. इशिका देरकर हिने द्वितीय, तर वेदिका बलकी हिने तृतीय क्रमांक मिळविला. या गटात चंचल झोडे, अश्विरा खान, पूर्वी देशमुख, आरोही किनाके आणि त्रिशा बागडते यांना प्रोत्साहनपर बक्षिसांनी गौरविण्यात आले.


         खुल्या गटातही चुरशीची लढत पाहायला मिळाली. आकाश पुनवटकर याने प्रथम क्रमांक मिळवत आपले वक्तृत्व सिद्ध केले. तेजस्विनी गव्हाणे हिने द्वितीय, तर तरफिया शेख आणि खुशी सहारे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. झीनत शेख, झकीरुन खान, जगदीश भगत आणि संतोष आसूटकर यांना या गटात प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.


        स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शालेय गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५०० व १ हजार रुपये, तर खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये देण्यात आले. प्रोत्साहनपर पारितोषिकांनीही स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात आला.


       कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. ओबीसी समाजरत्न पुरस्कार देवराव पाटील धांडे यांना, तर ओबीसी समाजभूषण पुरस्कार प्रा. बाळकृष्ण राजुरकर आणि प्रभाकर मोहितकर यांना प्रदान करण्यात आला. विजय गंधेवार आणि पत्रकार शुभम कडू यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.


      स्पर्धेचे परीक्षण प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. विजय बोबडे, प्रा. नितीन मोहितकर, लक्ष्मण इद्दे , धनंजय उरकुडे आणि सुभाष वैद्य यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बोनगीरवार, पांडुरंग पंडिले, बालाजी म्हसे , संजय खाडे, नारायण मांडवकर, नामदेव जेनेकर, भैय्याजी पिंपळकर आणि मोहन हरडे यांची उपस्थिती होती.


      कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले. रघुनाथ कांडरकर यांनी प्रास्ताविक केले, तर नारायणराव मांडवकर यांनी आभार मानले.


       वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रबोधनकारी विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 


      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, वणी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, सावर्ला तसेच OBC (VJ/DNT/NT/SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-झरी-मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.


       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास शेरकी , सुरेंद्र बुच्चे , काशिनाथ पचकटे, विलास गवारकर, महेश खामनकर, पुंडलिकराव मोहितकर, रामजी महाकुलकर, गुलाब वांढरे, गजेंद्र भोयर, काशिनाथ बुच्चे, कृष्णदेव विधाते, विनोद झाडे, सुरेश राजूरकर, भाऊराव मत्ते, रवींद्र आंबटकर,  नवखरे सर , प्रा. अनिल टोंगे आणि आनंद भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad