शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणारा ‘रुद्राक्ष वनप्रकल्प’ निधीअभावी रखडला असून, प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने सुरू करण्यासाठी ११ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी नगर परिषदेचे सदस्य रवि बेलुरकर यांनी केली आहे.
वणी शहरापासून सुमारे ६ ते ७ किलोमीटर अंतरावर निंबाळा (रोड) परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५३ मध्ये हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. महसूल व वनविभागाच्या मान्यतेनंतर प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रकल्पाचे एकूण अंदाजपत्रक १४ कोटी ९७ लाख रुपये असून, सुरुवातीला शासनाकडून ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.
या निधीतून संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, कार्यालय आणि नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक यांसारखी प्राथमिक कामे करण्यात आली. मात्र, पुढील कामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाची कामे रखडली आहेत.
‘रुद्राक्ष वन’ हा केवळ वृक्षलागवडीचा प्रकल्प नसून नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य सार्वजनिक स्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. परिसरात रुद्राक्षाच्या झाडांसह विविध औषधी वनस्पती, फुलझाडे आणि बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास वणीच्या हरित क्षेत्रात वाढ होऊन नागरिकांना फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होऊ शकते.
. प्रकल्प निधीअभावी रखडल्याची बाब लक्षात घेऊन रवि बेलुरकर यांनी माजी वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत मुनगंटीवार यांनी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांना पत्र लिहून प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर आता वनविभागाकडून निधी मंजुरीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘रुद्राक्ष वनप्रकल्प’ वणीच्या विकासात महत्त्वाची भर घालू शकतो. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प रखडून न ठेवता शासनाने उर्वरित ११ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी मागणी रवि बेलुरकर यांनी केली आहे.
“रुद्राक्ष वनप्रकल्प पूर्ण झाल्यास वणीच्या पर्यावरणीय सौंदर्यात भर पडेल. नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर परिसर उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून प्रकल्पाचे काम पूर्ण करावे,” अशी अपेक्षा रवि बेलुरकर यांनी व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या