देशभक्तीचा उत्साह, वाचनसंस्कृतीची जपणूक आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत विठ्ठलवाडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजुरकर यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय, अभ्यासाची गोडी आणि ज्ञानाची दिशा देण्याच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्वातंत्र्य केवळ राजकीय नसून विचारांचे, ज्ञानाचे आणि शिक्षणाचेही असते, हा विचार यावेळी उपस्थितांच्या मनात रुजविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव प्रा. विजय बोबडे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका वाचनालयाचे संचालक तथा अभ्यासिकेचे अध्यक्ष प्रा. अनिलकुमार टोंगे यांनी मांडली. त्यांनी वाचनालयाची सामाजिक भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी नियमित वाचनातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष रामजी महाकुलकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाचनालयाचे संचालक, पदाधिकारी, आजीवन सभासद, अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला.
यावेळी वाचनालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या वाचनविषयक उपक्रमांचेही कौतुक करण्यात आले. ज्ञानाची मशाल तेवत ठेवणाऱ्या वाचनालयाच्या उपक्रमांना नागरिकांनी अधिकाधिक सहकार्य करावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वाचनालयाचे सहसचिव गजेंद्र भोयर यांनी उपस्थित मान्यवर, सभासद आणि नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल शुभम कडू तसेच सहाय्यक तथा अभ्यासिकेचे व्यवस्थापक वैभव येरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या