Type Here to Get Search Results !

संजय खाडेंच्या पाठपुराव्याला यश; उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नावर सीएमडींची प्रत्यक्ष पाहणी


 वणी :

        गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उकणी गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी (१२ ऑगस्ट) वेकोलिचे अध्यक्ष-सह- व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी उकणी गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रलंबित जमीन संपादनाची प्रत्यक्ष पाहणी करून वेकोलि अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.  


    उकणीवासीयांच्या पुनर्वसन, मोबदला, जमीन संपादन आणि प्रदूषणाच्या प्रश्नांसाठी कामगार नेते संजय खाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे सीएमडींच्या प्रत्यक्ष भेटीमुळे या प्रश्नांना आता प्रशासनाकडून गांभीर्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.  


      यावेळी संघर्ष समितीने सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे, प्रदूषण आणि उर्वरित जमीन संपादनाचा मुद्दा सीएमडींसमोर मांडला. उकणी खंड-१ परिसरातील सुमारे १७० शेतकऱ्यांची जमीन अद्याप संपादित झालेली नसून, हे संपादन तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.  


   तसेच सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन, घरांच्या मोबदल्याचे फेरमूल्यांकन करून बाजारभावाप्रमाणे भरपाई आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी संघर्ष समितीने केली.


   📌  प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा – संजय खाडे


         “सीएमडी साहेबांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, ही दिलासा देणारी बाब आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळेल आणि आमच्या मागण्या लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे,” असे कामगार नेते संजय खाडे यांनी सांगितले.


        सीएमडींच्या भेटीमुळे उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि उकणीवासीयांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad