Type Here to Get Search Results !

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात; वेकोलीवर कठोर कारवाईची मागणी


वणी :

       सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी तालुक्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पूरस्थितीस वेकोली (WCL) प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत, वेकोलीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे.


         सततच्या मुसळधार पावसामुळे आणि नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे वणी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोलगाव, साखरा, जुगाड, माथोली, चिंचोली, सावंगी, नायगाव, चिखली, परमडोह, टाकळी, कळमना, येनाडी, शिवणी आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतातील उभी पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


        यासंदर्भात बोलताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोली प्रशासनावर गंभीर आरोप केले. खाणकामातील अयोग्य नियोजन, पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळेच गावांमध्ये व शेतांमध्ये पाणी साचून कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.


       फाल्गुन गोहोकार म्हणाले, "या संपूर्ण विदारक परिस्थितीस वेकोली प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच वेकोली प्रशासनाकडूनच पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी."


       मनसेने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या असून, महसूल व कृषी विभागाने कोणतीही दिरंगाई न करता पूरग्रस्त शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करावेत, पूरस्थितीस जबाबदार असलेल्या वेकोली प्रशासनावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत आणि सर्व बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


      दरम्यान, शासन आणि प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad