ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चनोडा ते मारेगाव मार्गावर मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी बसची अपुरी उपलब्धता, वेळापत्रकातील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाशी संबंधित अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून ‘अमित साहेब ठाकरे दत्तक योजना’ अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज प्रवास करावा लागतो. मात्र काही ठिकाणी बससेवा अपुरी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.
मानव विकास मिशन अंतर्गत उपलब्ध असलेल्या काही बस विद्यार्थ्यांच्या थांब्यांवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मनसेने पुढाकार घेत मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चनोडा ते मारेगाव मार्गावरील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बस सेवेच्या शुभारंभप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर, ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनानेही दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या