Type Here to Get Search Results !

वणीकरांचा संयम संपला! वाहतूक कोंडीवर लढा संघटना मैदानात


 वणी :

      शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधत लढा संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील अनधिकृत वाहन थांबे, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


       लढा संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, वणी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच मुख्य मार्गांवर ऑटो, ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहनांचे अनधिकृत थांबे करण्यात आले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांच्या दैनंदिन हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.


       शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. याशिवाय रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही वाहतूक कोंडीमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अनेक वाहनचालक चौकांमध्येच वाहने उभी करत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.


      यावेळी संघटनेने शहरातील सर्व अनधिकृत वाहन थांबे तात्काळ हटविणे, चौकाचौकात वाहतूक पोलीसांची नियमित नियुक्ती करणे, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, ऑटो व प्रवासी वाहनांसाठी अधिकृत थांबे निश्चित करून फलक लावणे, विशेष वाहतूक मोहीम राबविणे तसेच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारण्याची मागणी केली.


     वणी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक हिताचा विचार करून प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी लढा संघटनेने केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. निवेदन देताना लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे यांच्यासह आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, सुभाष लसंत्ते आणि तानबाजी कडू उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57