तिरळे कुणबी समाज संघटना, तालुका वणी यांच्या वतीने आज शनिवारी (दि. १८ जुलै) स्थानिक शेतकरी मंदिर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच समाजबांधवांमध्ये एकोपा आणि संवाद वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात सन २०२४-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाअंतर्गत दुपारी ३ वाजल्यापासून महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. मुख्य कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्री. नारायणराव विश्वासरावजी देवडे भूषविणार आहेत. मार्गदर्शक म्हणून वणीचे तहसीलदार मा. श्री. निखिल धुळधर आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. डॉ. सचिन गाडे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. संगीताताई रा. खांडेकर, माजी संचालक मा. श्री. नरेंद्र पाटील ठाकरे तसेच साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, यवतमाळचे संचालक मा. श्री. बिपिन अनिलराव चौधरी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तिरळे कुणबी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वणी यांच्या वतीने सर्व समाजबांधवांनी सपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


