Type Here to Get Search Results !

ओ साहेब, कधी येणार नळाला शुद्ध पाणी? ‎विठ्ठलवाडीकरांचा संताप


 वणी :

         ‎ "ओ साहेब, कधी येणार नळाला शुद्ध पाणी?" हा प्रश्न आज विठ्ठलवाडीतील प्रत्येक घरातून ऐकू येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात गढूळ, दुर्गंधीयुक्त व सांडपाणी मिश्रित असल्याचा संशय असलेला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अखेर या प्रश्नाला वाचा फोडत विठ्ठलवाडी परिसरातील तब्बल 51 नागरिकांनी स्वाक्षरी करून वणी नगर परिषदेकडे सामूहिक तक्रार दाखल केली आहे.

‎

‎              विठ्ठलवाडी येथील रहिवासी अनिलकुमार नामदेवराव टोंगे यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनावर परिसरातील 51 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणारे पाणी पिण्यास, स्वयंपाकासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी अयोग्य ठरत आहे. अनेकांना पाणी वापरण्यापूर्वी ते गाळावे लागत असून काहींनी पिण्यासाठी विकतच्या पाण्यावर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे. मात्र सर्वसामान्य कुटुंबांना हा अतिरिक्त आर्थिक भार परवडणारा नाही.


‎     "कर भरतो आम्ही, पण शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो," अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. सुरक्षित पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असताना विठ्ठलवाडीकरांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनात विठ्ठलवाडी परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ पाहणी, विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणी, पाणीपुरवठा व सांडपाणी वाहिन्यांची संयुक्त तपासणी, तसेच दूषिततेचे कारण शोधून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.


‎      याशिवाय, समस्या पूर्णपणे निकाली निघेपर्यंत परिसरातील नागरिकांना दररोज मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तपासणी व करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात देण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनासोबत दूषित पाण्याची छायाचित्रे, व्हिडिओ आणि नागरिकांच्या स्वाक्षरीयुक्त यादीही जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या तक्रारीची गंभीरता अधिक वाढली आहे.


‎     नागरिकांच्या मते, पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी सामूहिक तक्रार करण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. तब्बल 51 नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठविल्यानंतरही प्रश्न कायम राहिल्यास नागरिकांमध्ये नाराजी आणखी वाढू शकते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

‎

‎    आता प्रश्न एकच आहे – 51 नागरिकांच्या सह्यांनंतरही प्रशासन जागे होणार का? विठ्ठलवाडीकरांना शुद्ध पाणी कधी मिळणार ? नागरिकांनी दिलेले हे निवेदन केवळ तक्रार नसून, मूलभूत सुविधांसाठीचा आक्रोश असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विठ्ठलवाडीतील नागरिकांनी प्रशासनाकडून तात्काळ आणि ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना न केल्यास नागरिक पुढील भूमिका जाहीर करू शकतात, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image