Type Here to Get Search Results !

पूर Mode ON ? यवतमाळमध्ये पुढील 48 तास High Risk


यवतमाळ : 

     प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्या हवामान अंदाजानुसार भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विदर्भातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


        जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय होण्याची तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


       नद्या, नाले व ओढ्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये. तसेच पुलांवर किंवा रपट्यांवरून पाणी वाहत असताना वाहन अथवा पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो जीवघेणा ठरू शकतो.


       पाणी साचलेल्या भागात विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा उघड्या विद्युत तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. घरामध्येही ओल्या हाताने विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. सोशल मीडियावरील अफवा किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना :- 


       विजांचा कडकडाट सुरू झाल्यास शेतकरी बांधवांनी तात्काळ पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा. झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे. काढणीस तयार झालेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच साठवून ठेवलेले धान्य पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. पूरग्रस्त किंवा सखल भागातील पाळीव जनावरे सुरक्षित व उंच ठिकाणी हलवून झाडाखाली बांधणे टाळावे, असेही कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.


        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad