शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी संघटन विस्ताराचा ध्यास घेत वणी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या नव्या शाखा स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्याच अनुषंगाने तालुक्यातील रासा येथे मंगळवारी (दि. २२ जुलै) शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विजय बाबू चोरडिया यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणाही करण्यात आली.
उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विजय बाबू चोरडिया म्हणाले की, शिवसेनेची विचारधारा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वणी तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून संघटन अधिक मजबूत करण्यात येणार आहे. तसेच जनतेच्या समस्या तत्परतेने सोडविणे, समाजहिताची कामे प्राधान्याने करणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दीपक कोकास, सुधाकर गोरे, किशोर नांदेकर, प्रसाद ठाकरे, शिवराज पेचे, शुभम गोरे, धीर राजूरकर, राहुल पारखी, हिमांशु बोहरा, अनिल ढगे, अमृत पुरी, कपिल कुंटलवार, प्रज्योत ठावरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या माध्यमातून जनसेवा, समाजहिताची कार्ये आणि शिवसेना संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या