डॉ. आदे यांच्या लेखनाचा ठसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. "फुललेली बाग" या स्मरणिकेत त्यांच्या साहित्यकृतीचा समावेश झाला असून, त्यांच्या लेखनाचा सुगंध सातासमुद्रापार पोहोचला आहे. त्यांच्या शब्दांमधील सामाजिक जाणीव, वास्तववादी मांडणी आणि मानवी संवेदनांचा प्रभाव देश-विदेशातील वाचकांनाही भावला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी चित्रपट या प्रभावी माध्यमाचाही उपयोग केला. मतदान जनजागृती आणि रोजगार या विषयांवर त्यांनी तयार केलेले लघुचित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. या चित्रपटांनी नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व, युवकांना रोजगाराविषयी जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले. मनोरंजनासोबतच प्रबोधन हेच त्यांच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य राहिले आहे.
कविता हा त्यांच्या अभिव्यक्तीचा आणखी एक प्रभावी पैलू आहे. "टुकार" आणि "बाप" हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून वाचकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या कवितांमध्ये समाजातील विसंगतींवर भाष्य करताना मानवी भावनांची प्रखर अभिव्यक्ती दिसून येते. याशिवाय "तळतळाट" आणि "पाऊस" हे दोन काव्यसंग्रह प्रकाशनाच्या उंबरठ्यावर असून साहित्यविश्वात त्यांची उत्सुकता आहे. सध्या ते "अजून माझा बाप काही केल्या मरत नाही" या कादंबरीच्या लेखनात व्यस्त आहेत. ग्रामीण जीवन, कुटुंबव्यवस्था, संघर्ष, नातेसंबंध आणि भावनिक वास्तव यांचा वेध घेणारी ही कादंबरी मराठी साहित्याला नवा आयाम देईल, अशी अपेक्षा आहे.
पत्रकार म्हणूनही त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे लेखन केले आहे. सत्याला प्राधान्य देत जनतेच्या समस्या मांडण्याची त्यांची शैली वेगळी ठरते. नवोदित लेखक, कवी आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. पुरस्कार, सन्मान आणि लोकप्रियता हे त्यांच्या कार्याचे फलित असले तरी समाजजागृती, माणुसकी आणि परिवर्तन हा त्यांच्या जीवनप्रवासाचा केंद्रबिंदू आहे. शब्दांची ताकद, कलेची संवेदनशीलता आणि समाजसेवेची तळमळ यांचा सुंदर मिलाफ म्हणजे डॉ. विनोदकुमार आदे. त्यांच्या साहित्याचा, कलेचा आणि सामाजिक कार्याचा प्रवास पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या