Type Here to Get Search Results !

‎जनतेच्या हक्कांसाठी विजय पिदुरकर रस्त्यावर; ९ जुलैला रस्ता रोको आंदोलन


‎वणी :

          वेकोलीच्या कोलगाव-मुंगोली कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी पुढाकार घेत गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कोलगाव चेक पोस्ट, साखरा-शिंदोला मार्गावर रस्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.


‎           गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाढते धूळ प्रदूषण, अपुरी सुरक्षा व्यवस्था, स्थानिक बेरोजगारांना रोजगारात मिळणारे कमी प्राधान्य तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विजय पिदुरकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने त्यांनी आता जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.


‎           यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, वणी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, कोलगाव ते वेकोली चेक पोस्टपर्यंतचा रस्ता तातडीने दुरुस्त करणे, साखरा-मुंगोली मार्गाचे मजबुतीकरण करणे, कोळसा वाहतुकीसाठी स्वतंत्र व सुरक्षित पार्किंग व्यवस्था उभारणे, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी करणे, महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्रीटलाइट बसविणे, धोकादायक झाडे हटविणे आणि स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.


‎          परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी विजय पिदुरकर यांनी घेतलेल्या या भूमिकेचे अनेक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि विविध सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असल्याचे समजते. "जनतेच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लोकशक्तीच्या माध्यमातून संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशाराही विजय पिदुरकर यांनी दिला आहे. त्यामुळे ९ जुलै रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad