Type Here to Get Search Results !

वणीतील वाहतूक कोंडीवर विजय चोरडिया आक्रमक; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

वणी : 

‎           शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेला निवेदन सादर करून शहरातील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. 

         निवेदनात कोविड काळात बंद करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यवस्था (वन-वे) त्वरित पुन्हा सुरू करावी, टिळक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करावेत तसेच कामगार चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक चौकी उभारण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

‎             शहरातील वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित पार्किंग आणि प्रमुख चौकांमधील सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच अपघातांचा धोकाही वाढत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

‎         केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शहरातील वाहतूक प्रश्न हा आता केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा गंभीर मुद्दा बनला असल्याचे त्यांनी सांगितले.

          संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन सादर करताना विजय चोरडिया, दीपक कोकास, शुभम गोरे, वसुधा ढगे, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, सोनाली पुरी, हिमांशू बोहरा, शम सिद्दीकी, अनिल ढगे, अमृत पुरी, सुनील डोंगरे, राहुल उपाते आणि प्रज्योत ठावरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad