मुकुटबन :
ज्ञानदा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था संचलित आर्या इंटरनॅशनल स्कूल, मुकुटबन येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५ जुलै) पालखी सोहळा व भव्य दिंडी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यात इयत्ता नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात "जय हरी विठ्ठल"चा अखंड जयघोष केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांसह पालखी मुकुटबन येथील ओम नगरीपासून मार्गक्रमण करत बसस्थानक परिसरात पोहोचली.
रॅलीदरम्यान ठिकठिकाणी वारकरी भक्तांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांचे पाय धुऊन त्यांचे औक्षण केले. ओम नगरी परिसरातील महिला व पुरुष मंडळीही या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी आकर्षक रिंगण सोहळा सादर केला. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी संतांचे विचार, सामाजिक ऐक्य, पर्यावरण संरक्षण व जनजागृतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन समाजप्रबोधन केले. संपूर्ण परिसर "विठ्ठल नामाच्या" गजराने दुमदुमून गेला असून वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे व सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले. या पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या