वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी-जामणी आणि मारेगाव तालुक्यांतील जिल्हा परिषद व शासनाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार संजय देरकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शिक्षक भरती व पदस्थापनेच्या प्रक्रियेत विरोधी पक्षाच्या मतदारसंघांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
देरकर यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतल्यास विरोधी पक्षाच्या आमदारांचे प्रतिनिधित्व असलेल्या मतदारसंघांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनाला विविध पक्षांतील अनेक आमदारांनी पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा पक्षीय राजकारणापलीकडचा असून रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार देरकर यांच्याशी चर्चा केली व शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वणी विधानसभा क्षेत्रासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी आमदार संजय देरकर यांनी पुन्हा एकदा राज्य शासनाकडे केली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या