वणी :
. शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील १५ वर्षीय मुलगी गर्भाशयासंबंधी गंभीर आजाराने त्रस्त होती. दि. २० जुलै रोजी प्रकृती अधिकच खालावत असल्याने स्थानिक डॉक्टरांनी तातडीने नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणे अशक्य झाले होते.कुटुंबात आई, वडील आणि मुलगी असे तिघेच सदस्य असून, मुलीच्या उपचाराची चिंता आणि पैशांची कमतरता यामुळे तिच्या आईने अनेकांकडे मदतीची याचना केली. परंतु, वेळेवर कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते नारायण मांडवकर यांच्याशी संपर्क साधला. मांडवकर यांनी ही बाब तात्काळ शेतकरी, कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
परिस्थितीचे गांभीर्य समजताच संजय खाडे यांनी कोणतीही औपचारिकता किंवा विलंब न करता तातडीने ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. अवघ्या १५ मिनिटांत ॲम्ब्युलन्स संबंधित कुटुंबाच्या दारात पोहोचली आणि त्याच रात्री मुलीला पुढील उपचारासाठी नागपूर येथे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
संजय खाडे हे केवळ राजकीय पदाधिकारी म्हणून नव्हे, तर संकटसमयी सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय मदत, आपत्कालीन सेवा, शेतकरी, कामगार तसेच गरजू कुटुंबांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. या घटनेतही त्यांनी वेळेचे महत्त्व ओळखून दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे एका निष्पाप मुलीला वेळेत उपचारासाठी नागपूरला पोहोचविणे शक्य झाले.
मुलीच्या आई-वडिलांनी संजय खाडे यांनी दिलेल्या तातडीच्या मदतीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, संकटाच्या क्षणी कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात देणारे संजय खाडे यांच्यासारखे समाजाभिमुख नेतृत्व गरजूंसाठी मोठा आधार असल्याच्या भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या