Type Here to Get Search Results !

लॉकर गायब, ५० हजार गायब... वणीत धक्कादायक घरफोडी


 वणी :

‎     शहरातील गणेशपूर परिसरातील एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात जबानी अहवाल नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांतकुमार रामलु मीना (वय ४४), रा. सदाशिव नगर, चिखलगाव, ता. वणी हे व्यापारी असून त्यांची व्यावसायिक भागीदार सरिता नारायण कोत्ता (वय ३७) या गणेशपूर येथील अमर टाऊनशिपमधील रो-हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. सरिता कोत्ता या कुटुंबासह दोन दिवसांपासून तिरुपती बालाजी दर्शनासाठी बाहेरगावी गेल्या होत्या.

‎    शुक्रवारी (दि. २५) सकाळी सरिता कोत्ता यांनी फोनवरून त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रशांतकुमार मीना यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये तोडलेले कुलूप पडलेले दिसले. वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते तसेच कपाटातील छोटा लॉकर गायब असल्याचे निदर्शनास आले.

‎         याबाबत सरिता कोत्ता यांच्याशी संपर्क साधला असता, लॉकरमध्ये ५० हजार रुपये (₹५०० च्या नोटा) ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. ही रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. इतर कोणते साहित्य चोरीस गेले आहे, याची खात्री सरिता कोत्ता वणी येथे परतल्यानंतर होणार असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. ही चोरी २४ जुलैच्या मध्यरात्री ते २५ जुलैच्या सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad