Type Here to Get Search Results !

प्रतिकूल परिस्थितीवर मात; तेजस्विनी भोयर यांची ‘सौंदरा गुरुकुल फेलोशिप’साठी निवड


 प्रतिनिधी : मंगेश राऊत (कोरा, जि. वर्धा)


           आर्णी तालुक्यातील तरोडा (मंगरूळ) येथील रहिवासी तथा महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी राजाभाऊ भोयर हिची प्रतिष्ठित ‘सौंदरा गुरुकुल फेलोशिप’साठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


         कु. तेजस्विनीच्या जीवनप्रवासात अनेक कठीण प्रसंग आले. एम.एस.डब्ल्यू.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने खचून न जाता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्याचबरोबर फेलोशिपच्या कठीण निवड प्रक्रियेला आत्मविश्वासाने सामोरे जात मुलाखतीत यश संपादन केले.


          वैयक्तिक संकटांवर मात करत तिने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे आवश्यक असल्याचा तिचा ठाम विश्वास असून भविष्यात शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा तिचा निर्धार आहे.


         कु. तेजस्विनीने लेखन, वक्तृत्व, नेतृत्व आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत झाले. त्यानंतर वस्तीगृहात राहून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच शिक्षणासाठी संघर्ष करत ती आज या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गावातून ‘सौंदरा गुरुकुल फेलोशिप’साठी निवड होणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.


       आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, सर्व शिक्षकवृंद, प्रा. तक्षशिला मोटघरे (वर्गशिक्षिका), दिनेश चौधरी (मामा), निलेश चौधरी (मामा), बाबुराव भोयर (काका), छोटी बहीण संजीवनी भोयर, वडिलांचे मित्र श्री. अनंतराव सूर्यकार सर, एज्युकेशन फेलो हब, नेचर फाउंडेशन, नागपूर तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शन व सहकार्याला दिले आहे.


        कु. तेजस्विनी भोयर यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57