शहरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत वणी पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी गणेशपूर रोड परिसरात छापा टाकून १९.२७ ग्रॅम एमडी अमली पदार्थ व एक मोबाईल फोन असा एकूण १ लाख ४९ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थांचे विक्री, सेवन व वाहतूक यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. १९ जून) रात्री ९.४५ वाजता गणेशपूर रोड येथे पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय २८, रा. तेलीफैल, वणी) याच्या अंगझडतीत प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलेले १९.२७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, ज्याची किंमत १ लाख ३४ हजार ८९० रुपये, तसेच १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ४९ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान सदर अमली पदार्थ प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे (वय २७, रा. तेलीफैल, वणी, सध्या नागपूर) याच्याकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१४/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) व २१(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी एमडी अमली पदार्थ विक्री प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ मध्ये सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रज्योत महेश उपरे (२७, रा. तेलीफैल, वणी) अविनाश विजय पाटील (४२, रा. छोरिया ले-आऊट, वणी) रविंद्र धनराज गुप्ता (३४, रा. रंगनाथ नगर, वणी) यांचा समावेश असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एमडी अथवा तत्सम अमली पदार्थांच्या विक्री, साठवण किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (पांढरकवडा प्रभार वणी) रॉबिन बन्सल आणि वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पोपुलवार, गणेश मेश्राम, अरविंद बुच्चे, मिथुन राऊत, श्याम राठोड व निलेश आडे यांनी पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या